हिरण्यवर्णामिति पञदशर्चस्य सूक्तस्य आनन्दकर्दमचिक्लीतेन्दिरासुता ऋषयः श्रीर्देवता आद्यास्तिस्रोऽनुष्टुभः चतुर्थी बृहती पञ्चमीषष्ठयौ त्रिष्टुभौ ततोऽष्टाऽवनुष्टुभः अन्त्या प्रस्तारपङ्क्तिः ।
हिरण्यवर्णाम् या पंधरा ऋचांच्या सूक्ताचे (कवी) इंदिरापुत्र आनंद, कर्दम, चिक्लीत हे ऋषी, लक्ष्मी देवता असून सुरुवातीच्या तीन ऋचा अनुष्टुभ, चौथी बृहती, पाचवी व सहावी त्रिष्टुभ नंतरच्या आठ अनुष्टुभ व शेवटची प्रस्तार छंदात आहेत.
काही अभ्यासकांच्या मते, प्रत्येक ऋचेचा ऋषी,छंद, देवता आणि विनियोग वेगवेगळे आहेत. आनंद, कर्दम, चिक्लीत, श्रीदा आणि इंदिरा हे ऋषी; अग्नी आणि श्रीदेवी या देवता, ‘हिरण्यवर्णाम्’ हे बीज ‘ताम् म आवह’शक्ती; आणि ‘कीर्तिमृद्धिम्’ कीलक आहे.
।।श्री गणेशाय नम:।।
हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजाम् ।
चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ॥१॥
हे अग्ने (जातवेद),सोन्यासमान वर्ण असणा-या, सर्व पातकांचे हरण करणा-या (हरिणीसमान सुंदर,चपळ असणा-या), सोन्या-चांदीच्या माळा धारण करणा-या, चंद्राप्रमाणे (शीतल) असलेल्या सुवर्णमय लक्ष्मीला माझ्यासाठी आवाहन कर.
तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम् ।
यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् ॥२॥
हे अग्ने, त्या कधीही दूर न जाणा-या (अविनाशी) लक्ष्मीला माझ्यासाठी आवाहन कर, जिच्याकडून मला धन, गाय, घोडा तसेच पुरुष (नातलग,मित्र) मिळावेत.
अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीम् ।
श्रियं देवीमुपह्वये श्रीर्मा देवी जुषताम् ॥३॥
जिच्या मिरवणुकीत सुरुवातीला घोडे, मध्यभागी रथ आहेत (जी रथात बसलेली आहे), जेथे हत्ती ललकारी देत आहेत, अशा लक्ष्मीला मी आमंत्रित करतो. ती देवी मजवर कृपा करो.
कांसोस्मितां हिरण्यप्राकारामार्द्रां ज्वलन्तीं तृप्तांतर्पयन्तीम् ।
पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपह्वये श्रियम् ॥४॥
जिचे हास्य चमकदार आहे, जी सुवर्णमखरात विराजमान आहे, जी मायाळू आहे, तेजस्वी आहे, स्वतः तृप्त असून इतरांनाही तृप्त करते, जी कमळात स्थानापन्न झाली असून तिची कांती कमळाप्रमाणे आहे, अशा लक्ष्मीला मी येथे आमंत्रित करतो. ती देवी मजवर कृपा करो.
चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदाराम् ।
तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्येऽलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे ॥५॥
चंद्रासमान आभा असलेली, जिचे यश देदीप्यमान आहे, तिन्ही लोकात देव जिची पूजा करतात, जी उदार आहे, अशा या `ई’ नामक लक्ष्मीला मी शरण जातो. माझे दारिद्र्य नष्ट होवो अशी तुला प्रार्थना करतो.
आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः ।
तस्य फलानि तपसा नुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः ॥६॥
हे सूर्याप्रमाणे कांती असलेल्या देवी, तुझ्या तपश्चर्येतून निर्माण झाला बेलाचा वृक्ष. त्याची फळे तपाच्या बलाने (माझ्या) अंतरीचे अज्ञान व बाहेरचे दैन्य दूर करोत.
टीप- येथे पांडुरंगशास्त्री आठवले यांनी लक्ष्मीच्या तपःसामर्थ्याने फुले न येताच फळणारा बेलाचा वृक्ष निर्माण झाला असा अर्थ घेतला आहे.
उपैतु मां देवसखः कीर्तिश्च मणिना सह ।
प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे ॥७॥
देवांचा मित्र (कुबेर) कीर्ती आणि जडजवाहिर यांचेसह मजकडे येवो. मी या देशात उत्पन्न झालो आहे. तो मला कीर्ती आणि उत्कर्ष देवो.
टीप– पांडुरंगशास्त्री आठवले यांनी ‘मणिना सह’ याचा अर्थ चिन्तामणिसह असा घेतला आहे. परंतु चिन्तामणि हा शब्द निश्चितपणे काय दर्शवितो हे स्पष्ट होत नाही.
क्षुत्पिपासामलां ज्येष्ठामलक्ष्मीं नाशयाम्यहम् ।
अभूतिमसमृद्धिं च सर्वान् निर्णुद मे गृहात् ॥८॥
भूक, तहान, अस्व्च्छता(रूपी) थोरल्या अलक्ष्मीचा मी नाश करतो. संकटे, अपयश या सर्वांना माझ्या घरातून दूर हाकलून दे.
गन्धद्वारां दुराधर्षान् नित्यपुष्टां करीषिणीम् ।
ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपह्वये श्रियम् ॥९॥
जी सुवासांचे प्रवेशद्वार आहे, जिच्यावर आक्रमण दुरापास्त आहे, जेथे नित्य समृद्धी नांदते आणि जी संपन्नेतेचे अवशेष सोडते, अशा त्या सर्व प्राणिमात्रांच्या स्वामिनी लक्ष्मीला मी येथे आमंत्रित करतो.
मनसः काममाकूतिं वाचः सत्यमशीमहि ।
पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीः श्रयतां यशः ॥१०॥
(माझ्या) मनीच्या इच्छा-आकांक्षांची पूर्ती, वाणीचा सच्चेपणा, पशू, सुंदर रूप आणि अन्न जिच्यामुळे मिळते, ती लक्ष्मी मला यश देवो.
कर्दमेन प्रजा भूता मयि सम्भव कर्दम ।
श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् ॥११॥
जनांसाठी चिखल (कर्दम) हाच आधारभूत आहे. हे कर्दमा (इंदिरेचा पुत्र), तू मजबरोबर रहा. माता लक्ष्मीला माझ्या कुळात स्थापित कर.
आपः सृजन्तु स्निग्धानि चिक्लीत वस मे गृहे ।
नि च देवीं मातरं श्रियं वासय मे कुले ॥१२॥
जलातून ओलसर (चिक्लीत) लोभसता निर्माण होऊ दे. हे चिक्लीता माझ्या घरात निवास कर. (आणि तुझ्याबरोबर) माता लक्ष्मीलाही माझ्या कुलात स्थापन कर.
आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीम् ।
चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ॥१३॥
हे अग्ने, कमळांच्या तलावाप्रमाणे रसपूर्ण असणा-या, (जनांचे) पोषण करणा-या, सोनेरी वर्णाच्या, कमळांचा हार घातलेल्या, चंद्रासारख्या (शीतल), सुवर्णमय लक्ष्मीला तू मजसाठी आवाहन कर.
आर्द्रां यः करिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीम् ।
सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ॥१४॥
हे अग्ने, जी आर्द्र (जगताच्या निर्माणाला) आधार देणारी आहे, कमळांचा हार घातलेल्या सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे, अशा सुवर्णमय लक्ष्मीला तू मजसाठी आवाहन कर.
तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम् ।
यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योऽश्वान् विन्देयं पुरुषानहम् ॥१५॥
हे अग्ने, दूर न जाणा-या (मजसवे कायम निवास करणा-या), जिच्यात (जिच्यामुळे) मला भरपूर धन, गाई, सेवक, घोडे मिळतील अशा लक्ष्मीला तू मजसाठी आवाहन कर.
यः शुचिः प्रयतो भूत्वा जुहुयादाज्यमन्वहम् ।
सूक्तं पञ्चदशर्चं च श्रीकामः सततं जपेत् ॥१६॥
जो (शरीराने) पवित्र व भक्तीने परिपूर्ण असलेला (साधक) दररोज तुपाने हवन करील, (त्याचे मनोरथ पूर्ण होतील). लक्ष्मीची आकांक्षा असणा-याने या सूक्ताची पंधरा कडवी नित्य पठन करावीत.
पद्मानने पद्म-ऊरु पद्माक्षि पद्मसम्भवे ।
त्वं मां भजस्व पद्माक्षि येन सौख्यं लभाम्यहम् ॥१७॥
कमळाप्रमाणे, (सुहास्य) मुख, कोमल मांड्या, (विशाल) नेत्र असलेल्या, कमळात जन्मलेल्या पद्माक्षी, तू माझा स्वीकार कर, जेणेकरून मला सुख मिळेल.
अश्वदायि गोदायि धनदायि महाधने ।
धनं मे जुषतां देवि सर्वकामांश्च देहि मे ॥१८॥
घोडे, गायी, संपत्ती देणा-या समृद्धीच्या देवते, मजवर धनाची कृपा कर, माझे सर्व मनोरथ पूर्ण कर.
पुत्रपौत्र धनं धान्यं हस्त्यश्वादिगवे रथम् ।
प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु माम् ॥१९॥
(हे देवी),तू सर्व जनांची माता आहेस. तू मला मुलगे, नातू, संपत्ती, धान्य, हत्ती, घोडे, गायी, रथ दे. मला उदंड आयुष्य दे.
धनमग्निर्धनं वायुर्धनं सूर्यो धनं वसुः ।
धनमिन्द्रो बृहस्पतिर्वरुणं धनमश्नुते ॥२०॥
(तुझ्याच कृपेने) अग्नी, वारा, सूर्य, आठ वसू, इंद्र, गुरु (बृहस्पती), वरुण हे धनवान झाले आहेत.
वैनतेय सोमं पिब सोमं पिबतु वृत्रहा ।
सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः ॥२१॥
हे गरुडा तू सोमरस पी, इंद्रानेही सोमरस प्राशन करावा. सोमरसरूपी धनाच्या धारणकर्त्यांनी मला सोमरस द्यावा.
न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो नाशुभा मतिः ।
भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत्सदा ॥२२॥
पुण्यवान भक्तां(च्या मनात) राग, मत्सर, लोभ, वाईट विचार येत नाहीत. श्रीसूक्ताचे नित्य पठन करावे.
वर्षन्तु ते विभावरि दिवो अभ्रस्य विद्युतः ।
रोहन्तु सर्वबीजान्यव ब्रह्मद्विषो जहि ॥२३॥
हे विभावरी, मेघातील विजेसारखा तुझ्या तेजाचा वर्षाव होवो. (आकाशीच्या मेघातून विजेच्या कडकडाटासह पाऊस पडो). सर्व बियाणातून कोंब उगवोत. ब्रह्म(ज्ञाना)चा द्वेष करणा-यांपासून संरक्षण कर.
पद्मप्रिये पद्मिनि पद्महस्ते पद्मालये पद्मदलायताक्षि ।
विश्व (विष्णु) प्रिये विष्णुमनोऽनुकूले त्वत्पादपद्मं मयि सन्निधत्स्व ॥२४॥
जिला कमळे आवडतात, जिच्या हातात कमळ आहे, कमळ हेच जिचे घर आहे, कमळाच्या पाकळीप्रमाणे जिचे डोळे आहेत, सर्व विश्वाला (विष्णूला) जी प्रिय आहे, जी श्रीविष्णूंच्या मनाला अनुकूल आहे, अशा श्रीलक्ष्मी तू तुझे चरणकमल मजजवळ ठेव.
या सा पद्मासनस्था विपुलकटितटी पद्मपत्रायताक्षी ।
गम्भीरावर्तनाभिः स्तनभर नमिता शुभ्र वस्त्रोत्तरीया ॥२५॥
जी कमळामध्ये बसली आहे, जिची कंबर आणि वक्ष विशाल आहेत, जिचे नेत्र कमळाच्या पाकळीसारखे दीर्घ आहेत, नाभी खोल व गोलाकार आहे, जी स्तनांच्या वजनाने (किंचित पुढे) झुकली आहे, जिने शुभ्र वस्त्र व शेला पांघरला आहे,
लक्ष्मीर्दिव्यैर्गजेन्द्रैर्मणिगणखचितैः स्नापिता हेमकुम्भैः ।
नित्यं सा पद्महस्ता मम वसतु गृहे सर्वमाङ्गल्ययुक्ता॥२६॥
विविध रत्नांनी मढविलेल्या स्वर्गीय श्रेष्ठ हत्तींनी सुवर्णाच्या कुंभांमधून जिला स्नान घातले आहे, अशी ती हातात कमळ घेतलेली, सर्व शुभ उपाधींनी युक्त लक्ष्मी नेहेमी माझ्या सदनात राहो.
लक्ष्मीं क्षीरसमुद्रराजतनयां श्रीरङ्गधामेश्वरीम् ।
दासीभूतसमस्तदेववनितां लोकैकदीपांकुराम् ॥२७॥
विशाल क्षीरसागराची कन्या असलेल्या, श्रीविष्णूची गृहस्वामिनी असणा-या, सर्व देवांच्या स्त्रिया जिच्या दासी बनल्या आहेत, जी तिहीं लोकातील एकमेव दिव्याच्या ज्योतीसारखी आहे, अशा लक्ष्मीला…..
श्रीमन्मन्दकटाक्षलब्धविभवब्रह्मेन्द्रगङ्गाधराम् ।
त्वां त्रैलोक्यकुटुम्बिनीं सरसिजां वन्दे मुकुन्दप्रियाम् ॥२८॥
जिच्या सुरेख कोमल कटाक्षांतून ब्रह्मा, इंद्र आणि शंकर यांना अनुग्रह प्राप्त झाला, त्या त्रैलोक्य जननी, श्रीविष्णूची भार्या कमलेला, तुला मी नमन करतो.
सिद्धलक्ष्मीर्मोक्षलक्ष्मीर्जयलक्ष्मीः सरस्वती ।
श्रीलक्ष्मीर्वरलक्ष्मीश्च प्रसन्ना मम सर्वदा ॥२९॥
सिद्ध लक्ष्मी, मोक्ष लक्ष्मी, जय लक्ष्मी, सरस्वती, श्री लक्ष्मी आणि वर लक्ष्मी मला सदैव प्रसन्न (असोत).
वरांकुशौ पाशमभीतिमुद्रां करैर्वहन्तीं कमलासनस्थाम् ।
बालार्क कोटि प्रतिभां त्रिनेत्रां भजेहमाद्यां जगदीश्वरीं त्वाम् ॥३०॥
(आपल्या चार हातांनी) वर, अंकुश, पाश (दोरीचा फास), व अभय धारण करणा-या, कमळावर बसलेल्या, कोटी उगवत्या सूर्यांचे तेज असणा-या, जगाच्या आद्य (सर्वप्रथम) स्वामिनीला, तुला दुर्गेला मी पूजितो.
सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधके ।
शरण्ये त्र्यम्बके देवि नारायणि नमोऽस्तु ते ॥
नारायणि नमोऽस्तु ते ॥ नारायणि नमोऽस्तु ते ॥३१॥
जी सर्व शुभ गोष्टीमधील मूर्तिमंत मांगल्य आहे, सर्व अर्थां (पुरुषार्थां)च्या बाबतीत जी कुशल आहे, कल्याणकारी आहे, अशा (सर्वांचे) रक्षण करणा-या पार्वती, नारायणी तुला नमस्कार असो.
सरसिजनिलये सरोजहस्ते धवलतरांशुक गन्धमाल्यशोभे।
भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरि प्रसीद मह्यम् ॥३२॥
कमळात निवास करणा-या, हाती कमळ धरणा-या, पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करणा-या, सुगंधी माळांनी सजलेल्या, रमणीय, तिहीं लोकांना संपन्नता देणा-या, श्रीविष्णूची प्रिय भार्या असणा-या, देवी मजवर कृपा कर.
विष्णुपत्नीं क्षमां देवीं माधवीं माधवप्रियाम् ।
विष्णोः प्रियसखीं देवीं नमाम्यच्युतवल्लभाम् ॥३३॥
श्रीविष्णूची भार्या, पृथ्वी रूपिणी, माधवाची प्रिय पत्नी तुलसी (माधवी), अच्युताची पत्नी अशा देवीला मी नमस्कार करतो.
महालक्ष्म्यै च विद्महे विष्णुपत्न्यै च धीमहि ।
तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात् ॥३४॥
आम्ही महालक्ष्मीला जाणतो, विष्णुपत्नीचे ध्यान करतो. ती लक्ष्मी आम्हाला प्रेरणा देवो.
श्रीवर्चस्यमायुष्यमारोग्यमाविधात् पवमानं महीयते ।
धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः ॥३५॥
(श्रीलक्ष्मी कृपेकरून) संपत्ती, बल, आयुष्य, आरोग्य, धन, धान्य, (गाई-बैलादि) पशु, अनेक पुत्र, शंभर वर्षांचे दीर्घायुष्य यांनी आमचे जीवन समृद्ध होवो.
ऋणरोगादिदारिद्र्यपापक्षुदपमृत्यवः ।
भयशोकमनस्तापा नश्यन्तु मम सर्वदा ॥३६॥
माझे कर्ज, रोगराई इत्यादि दैन्यावस्था, पाप, भूक, अकाली मृत्यु, भीति, दुःख, मनस्ताप सदैव नष्ट होवोत.
श्रीसूक्त – मराठी अर्थासह समाप्त .
||श्रीसूक्त मराठी अर्थासह ||
हेही वाचा : रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाचे पारायण कसे करावे?