श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दुसरा | Swami Samarth Charitra Saramrut Adhyay 2

श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दुसरा
श्री स्वामी समर्थ

॥ श्री गणेशाय नमः ॥

कामना धरोनी जे भजती । होय त्यांची मनोरथपूर्ति ।

तैसेचि निष्काम भक्ताप्रती । कैवल्यप्राप्ती होतसे ॥१॥

नृसिंहसरस्वती प्रगट झाले । अगणित पापी तारिले ।

कर्दळीवनी गुप्त जहाले । गुरुचरित्री ती कथा ॥२॥

पुढे लोकोद्धाराकारणे । भाग पडले प्रगट होणे ।

धुंडिली बहुत पट्टणे । तेचि स्वामी यतिवर्य ॥३॥

स्वामींची मीं जन्मपत्रिका । एका भक्ते केली देखा ।

परी तिजविषयी शंका । मनामाजी येतसे ॥४॥

गुरुराज गुप्त झाले । स्वामीरूपे प्रगटले ।

त्यांचे शकप्रमाण न मिळे । म्हणोनि शंका पत्रिकेची ॥५॥

ते केवळ अनादिसिद्ध । खुंटला तेथे पत्रिकावाद ।

लोकोद्धारासाठी प्रसिद्ध । मानवरूपे जाहले ॥६॥

अक्कलकोटा-माझारी । राचप्पा मोदी याचे घरी ।

बैसली समर्थांची स्वारी । भक्तमंडळी वेष्टित ॥७॥

साहेब कोणी कलकत्त्याचा । हेतू धरोनी दर्शनाचा ।

पातला त्याच दिवशी साचा । आदर तयाचा केला की ॥८॥

त्याजसवे एक पारसी । आला होता दर्शनासी ।

ते येण्यापूर्वी मंडळीसी । महाराजांनी सुचविले ॥९॥

तीन खुर्च्या आणोनी बाहेरी । मांडा म्हणती एके हारी ।

दोघांसी बैसवोनी दोहोवरी । तिसरीवरी बैसले आपण ॥१०॥

पाहोनी समर्थांचे तेज । उभयतांसी वाटले चोज ।

साहेबाने प्रश्न केला सहज । आपण आला कोठूनी ॥११॥

स्वामींनी मीं हास्यमुख करोनी । उत्तर दिले तयालागोनी ।

आम्ही कर्दळीवनांतुनी । प्रथमारंभी निघालो ॥१२॥

मग पाहिले कलकत्ता शहर । दुसरी नगरे देखिली अपूर्व ।

बंगालदेश समग्र । आम्ही असे पाहिला ॥१३॥

घेतले कालीचे दर्शन । पाहिले गंगा तटाक पावन ।

नाना तीर्थे हिंडोन । हरिद्वाराप्रती गेलो ॥१४॥

पुढे पाहिले केदारेश्वर । हिंडलो तीर्थे समग्र ।

ऐसी हजारो हजार । नगरे आम्ही देखिली ॥१५॥

मग तेथुनी सहज गती । पातलो गोदातटाकाप्रती ।

जियेची महाप्रख्याती । पुराणांतरी वर्णिली ॥१६॥

केले गोदावरीचे स्नान । स्थळे पाहिली परम पावन ।

काही दिवस फिरोन । हैदराबादेसी पातलो ॥१७॥

येउनिया मंगळवेढ्यास । बहुत दिवस केला वास ।

मग येउनिया पंढरपुरास । स्वेच्छेने तेथे राहिलो ॥१८॥

तदनंतर बेगमपूर । पाहिले आम्ही सुंदर ।

रमले आमुचे अंतर । काही दिवस राहिलो ॥१९॥

तेथोनि स्वेच्छेने केवळ । मग पाहिले मोहोळ ।

देश हिंडोनी सकळ । सोलापुरी पा तलो ॥२०॥

तेथे आम्ही काही महिने । वास केला स्वेच्छेने ।

अक्कलकोटा-प्रती येणे । तेथोनिया जाहले ॥२१॥

तैपासूनि या नगरात । आनंदे आहो नांदत ।

ऐसे आमुचे सकल वृत्त । गेले उठोनी उभयता ॥२२॥

ऐकोनिया ऐशी वाणी । उभयता संतोषले मनी ।

मग स्वामी आज्ञा घेवोनी । गेले उठोनी उभयता ॥२३॥

द्वादश वर्षे मंगळवेढ्याप्रती । राहिले स्वामीराज यती ।

परी त्या स्थळी प्रख्याती । विशेष त्यांची न जाहली ॥२४॥

सदा वास अरण्यात । बहुधा न येती गावात ।

जरी आलिया क्वचित । गलिच्छ जा गी बैसती ॥२५॥

कोणी काही आमोनि देती । तेचि महाराज भक्षिती ।

क्षणैक राहूनि मागुती । अरण्यात जाती उठोनी ॥२६॥

वेडा बुवा तयांप्रती । गावातील लोक म्हणती ।

कोणीही अज्ञाने नेणती । परब्रह्मरुप हे ॥२७॥

त्या समयी नामे दिगंबर । वृत्तीने केवळ जे शंकर ।

तेव्हा तयांचा अवतार । सोलापुरी जाहला ॥२८॥

ते जाणोनी अंतरखूण । स्वामींसी मीं मानिती ईश्वरासमान ।

परी दुसरे अज्ञ जन । वेडा म्हणोनी लेखिती ॥२९॥

दर्शना येता दिगंबर । लीलाविग्रही यतिवर्य ।

कंबरेवरी ठेवूनी कर । दर्शन देती तयासी ॥३०॥

अमृतासमान पुढे कथा । ऐकता पा वन श्रोता वक्ता ।

स्वामी समर्थ वदविता । ज्यांची सत्ता सर्वत्र ॥३१॥

अहो हे स्वामी चरित्र । भरला असे क्षिरसागर ।

मुक्त करोनी श्रवणद्वार । प्राशन करा श्रोते हो ॥३२॥

तुम्हा नसावा येथे वीट । सर्वदा सेवावे आकंठ ।

भवभयाचे अरिष्ट । तेणे चुके विष्णू म्हणे ॥३३॥

इति श्री स्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत ।

आनंदे भक्त परिसोत । द्वितीयोऽध्याय गोड हा ॥३४॥

॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥

श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दुसरा

Sharing Is Caring:
       

Leave a Comment